Breaking News
Loading...
Friday, 14 May 2010

Info Post

दिगदर्शक कमलाकर तोरणे यांनी यशवंत दत्त यांना घेऊन १९७६ मध्ये "भैरू पैलवान की जय' नावाचा चित्रपट बनविला तेव्हा तो चित्रपट धो धो चालला होता. त्यानंतर मराठी चित्रपटाची वाटचाल वेगवेगळ्या पद्धतीने होऊन ती आता एका स्थित्यंतरावर येऊन ठेपलीय. अलीकडे विविध विषयांवर निर्माण होणाऱ्या आशयसंपन्न मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या यशाने अनेक निर्मात्यांबरोबरच कंपन्याही मराठी चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रात उतरल्या असून, मराठी चित्रपटात "कॉर्पोरेट कल्चर' आले आहे. आता जुन्या "भैरू पैलवान'ची आठवण येण्याचे कारण निर्माते डॉ. अनिल सक्‍सेना आणि दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे यांचा येऊ घातलेला "भैरू पैलवान की जय हो' नावाचा चित्रपट. नऊ जानेवारीला मुहूर्त होऊन या चित्रपटाचे कोल्हापूर जिल्ह्यातील चित्रीकरण नुकतेच पार पडले.

किशाबापूचा मळा येथे या चित्रपटाचा मुहूर्त झाला आणि कांबळवाडी येथे आठवडाभर चित्रीकरण होऊन क्‍लायमॅक्‍सचे चित्रीकरण चांदी व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या हुपरीत पार पडले. सिद्धार्थ जाधव कुस्ती खेळतो व जिंकतो, असे दृश्‍य हुपरीतील अंबाबाई मंदिराशेजारी असलेल्या कुस्ती मैदानात चित्रित होणार होते. त्याअनुषंगाने सकाळी दहाच्या सुमारास सर्व तयारी झाली. त्यासाठी आवश्‍यक मैदान, मैदानाजवळ स्टेज, पैलवान आणि त्यासाठी सर्व कलाकार उपस्थित असणे आवश्‍यक होते. दिवसभरात ३० दृश्‍ये चित्रित होणार होती. त्यासाठी सिद्धार्थबरोबरच यतीन कार्येकर, उषा नाडकर्णी, उदय सबनीस, अभिनेत्री प्रियांका यादव, ज्युनियर कलाकार आणि पाच हजारांहून ग्रामस्थांचा सहभाग होता.

प्रवीण कारळे यांनी एक रिहर्सल घेतली. ती व्यवस्थित झाल्यानंतर "टेक' घेण्यास सुरुवात झाली. मात्र प्रेक्षकांच्या अतिउत्साहामुळे चित्रीकरणात अडथळे येत राहिले. त्या दिवशी असणाऱ्या सार्वजनिक सुटीमुळे हुपरीबरोबरच आसपासच्या गावातील लोकांचा ओढा हुपरीकडे होता. कुस्तीसाठी गर्दी अनावर झाल्याने दिग्दर्शकाला अपेक्षित दृश्‍ये घेता आली नाहीत. त्यामुळे त्या दिवसाचे "पॅकअप' करण्यात आले. सर्व कलाकार मोकळे झाल्याचे दिसताच मी प्रत्येकाला चित्रपटासंबंधी बोलते केले. सिद्धार्थ जाधव मोकळा झाला, हे लक्षात येताच त्याच्या फॅन मंडळींनी सहीसाठी त्याला गराडा घातला. तोही मेकअप न उतरवता सह्या देता राहिला. अखेरील प्रॉडक्‍शन टीमने त्याला मेकअप व्हॅनमध्ये नेले.

प्रेक्षकांच्या उत्साहाला आवर घालणे कठीण झाल्याने शेवटी सारे कलाकार चाहत्यांच्या गराड्यातून अक्षरशः धावतपळतच मोटारीत बसले आणि सर्वांनी कोल्हापूर गाठले. या प्रवासात दिग्दर्शक प्रवीण कारळे म्हणाले, ""हा चित्रपट बिगबजेट आहे. तो मेमध्ये प्रदर्शित करणार आहोत. चार गाणी असणाऱ्या या विनोदी चित्रपटाला "सिरियस टच'ही आहे अन्‌ प्रेक्षक त्याचे नक्कीच स्वागत करतील.''

विनोदी भूमिका बाजूला ठेवून वेगळी आणि गंभीर भूमिका या चित्रपटात केलेला व स्वतःच्या भूमिकेबद्दल आत्मविश्‍वास असलेला सिद्धार्थ जाधव यावेळी प्रचंड आनंदी होता. त्याला कारणही तसेच होते. आदल्या रात्रीच मुंबईत त्याच्या "जागो मोहन प्यारे' नाटकाचा पाचशेवा प्रयोग झाला होता. या प्रयोगाला मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. त्यांनी पूर्ण प्रयोग पाहिला. सर्वच कलाकारांचे अभिनंदन केले. शिवाय कानमंत्रही दिला. "ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय रात्र होती. ती मी कधीही विसरणार नाही,' असं सांगून सिद्धार्थ म्हणाला, की या चित्रपटासाठी मी कोल्हापुरातील परुळेकर जिममध्ये व्यायाम केला. ७० वरून वजन ७६ किलो केले. याबरोबरच योगासनं, ध्यानधारणा केली. अगदी आहारातही बदल केला. त्यामुळे आत्मविश्‍वास वाढला आणि मला वैयक्तिक आयुष्यातही फायदा झाला. चित्रपटासाठी गेल्या डिसेंबरमध्ये पिंपरीत झालेले कुस्ती मैदान पाहिले. कुस्तीतील डावपेचासाठी पुणे, कोल्हापूर येथील पैलवानांना भेटलो-बोललो. चित्रपटात उडाणटप्पू असणारा मी माझ्या आजीचे (उषा नाडकर्णी) स्वप्न पूर्ण करतो याचे चित्रीकरण आहे. या चित्रपटाबरोबरच "हुप्पा हुय्या' आणि "इरादा पक्का' या चित्रपटांबाबतही अनेक अपेक्षा आहेत.

चित्रपटात सरपंच नाना जगतापांची भूमिका केलेला यतीन कार्येकर म्हणाले, "या वेगळ्या भूमिकेमुळे चित्रीकरणादरम्यान खूप मजा आली.' "भैरू पैलवान'च्या वस्तादाची भूमिका केलेले अभिनेते उदय सबनीस म्हणाले, "भैरूच्या आजीला ठाम विश्‍वास असतो की, आपला नातू पैलवान होणार. मात्र तो सुरुवातीला कसा वागतो, पैलवान कसा होतो व काय करतो, आम्ही सर्व जण त्याला कशी मदत करतो हे पडद्यावर पाहणेच योग्य ठरेल. भावनाप्रधान असलेल्या या चित्रपटामुळे खेळाडूची मानसिकता तयार करण्याचे काम साध्य झाले आहे.'

रामगोपाल वर्मा यांच्या टीममध्ये असणारे व या चित्रपटात मास्तराची भूमिका करणारे संजय बेलोसे म्हणाले, "तालमीची जागा शाळेला कशी मिळेल यासाठी अडथळा आणणारी माझी भूमिका आहे. प्रवीण कारळे यांच्याबरोबर काम करताना मजा आली.'

चित्रपटात सुगंधाची भूमिका करणारी प्रियांका यादव म्हणाली, "प्रवीण कारळे यांच्याबरोबर माझा हा दुसरा चित्रपट. त्यांनी सेटवर स्वातंत्र्य दिल्याने चित्रीकरणासाठी प्रत्येक दिवस वेगळा वाटला. सुरुवातीला भैरूशी (सिद्धार्थ) माझे विचार पटत नाहीत. मात्र कथानक पुढे जाईल तशी आमची ओळख वाढून त्याचे रूपांतर प्रेमात होते. कुस्तीची पार्श्‍वभूमी असणाऱ्या या चित्रपटात मी सिद्धार्थच्या प्रेयसीच्या भूमिकेत आहे. "इमोशन' आणि धमाल कॉमेडी असणाऱ्या या चित्रपटात सिद्धार्थबरोबर माझे "ट्युनिंग' उत्तम जमलेय.

0 comments:

Post a Comment